माझे शिरवळ गाव...



शिरवळचे जुने नाव श्रीमाळ. श्री म्हणजे साक्षात लक्ष्मीची कृपा असलेले गाव.सिरीवलय हा त्याचा अपभ्रंश आणि शिरवळ हे साजर रूप. श्रीमाल,श्रीवलय,शिरवाणगड असाही या गावाचा उल्लेख केलेला आढळतो.

आजचे शिरवळ हे गाव सुमारे १४ व्या शतकापासून प्रचलित आहे. ‘सिरीवलय’ अशी अक्षरे खोदलेली एक तुळई गावातील मोने यांच्या दत्त मंदिरात आहे.तसेच ‘श्रीमाळ’ असा उल्लेख चालुक्य आणि राष्ट्रकूटांनी दिलेल्या दानपत्रांतून व ताम्रपटांतून केलेला आहे.

शिरवळ हे गाव म्हणजे कानदी,गुंजवणी,वेळवंडी,नीरा आणि शिवगंगा या पाच नदयानी समृद्ध असा प्रदेश.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळच्या अनेक आठवणी वास्तू रूपात आजही या गावात आहेत.नीरा नदीच्या तीरावर वसलेल्या गावात अनेक ऐतिहासिक मंदिरे दिमाखात आपले अस्तित्व टिकवून आहेत.


शिरवळची भूमी अनेक साधू-संत, राजे-महाराजे, रथी-महारथी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे.येथील अनेक ऐतिहासिक वास्तू याचीच साक्ष देतात.


राष्ट्रीय महामार्ग क्र.४ या गावावरूनच जातो.औद्योगिक वसाहतींमुळे या गावाच महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती कारखानदारी गावाच्या वैभवात भरच घालत आहे.पण,गावाचे सामाजिक ऐक्य यापुढेही चालू राहण्यासाठी ऐतिहासिक वास्तुंचे जतन करने हेही महत्त्वाचे आहे.


शिरवळचे दोन भाग आहेत.एक मुंजेरी आणि दूसरा मोहतर्फा.साधारणपणे नागरी वस्तीच्या भागाला ‘मुंजेरी’ आणि शेतीच्या भागाला ‘मोहतर्फा’ म्हणत.मूळ शिरवळचे एकूण क्षेत्रफळ १६१६ हेक्टर आहे.

शिवपूर्वकाळापासून या गावात निगडे देशमुख, कुलकर्णी, मांडके, वाळीबे, मोने, काझी, नायकवडी, कबूले(पवार), सेटे, महाजन ही घराणी अस्तित्वात आहेत.तसेच तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार बारा अलुते, बारा बलुते आणि अठरा नारू आहेत.या जाती पिढ्यानपिढ्या आपला व्यवसाय एकनिष्ठपणे करत आहेत.